Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा गौरव दिन काल राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

मराठीवरचे प्रेम आंतरिक जाणिवेतून प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही. माय मराठीचा जयजयकार करताना आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी पुण्यात व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थितांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर करून त्यांना अभिवादन केले.

लातूर इथल्या श्री केशवराज विद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी गौरव दिन साजरा झाला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी स्वाक्षरी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

मराठी भाषेची खरी श्रीमंती भाषेच्या विविध बोलीत असून या बोलींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन कवी दत्ता स्वामी उदगीर यांनी अन्य एका कार्यक्रमात केले.

गोष्ट सांगणे हा मानवी स्वभावाचा नैसर्गिक गुण असून कवितेच्या माध्यमातून न सांगता येणाऱ्या गोष्टी कथेच्या स्वरूपात मांडता येतात असे कथाकार बालाजी सुतार यांनी सांगितले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘कथा : निर्मिती आणि सादरीकरण’ या विषयावर झालेल्या ऑनलाईन परिसंवादात ते काल बोलत होते.

पालघर रेल्वे स्थानकात मनसेकडून, स्वाक्षरी करताय..? आपली स्वाक्षरी मराठीतूनच करा, या आशयाचा संदेश देणारा एक फलक लावण्यात आला. त्यावर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वत: मराठीतून आपली स्वाक्षरी करून मराठी भाषा दिन साजरा केला.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज यांनी काव्य, नाट्य, कादंबऱ्या या माध्यमातून विविध विषयांवर दर्जेदार लेखन केले आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी त्यांचे साहित्य वाचले पाहिजे. तसेच आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक केला पाहिजे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता म्हणाले.

महाव्यवस्थापक माधवी सरदेशमुख यांनी कुसुमाग्रजांची एक कविता वाचली आणि आपले मनोगत व्यक्त केले.

औरंगाबाद इथे कवीसंमेलन, व्याख्याने, ऑनलाईन व्याख्याने झाली. उस्मानाबाद इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातल्या साहित्यिकांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.

मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा यासाठी विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास आणि विकास विषयक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांनी सांगितले. या दिनानिमित्त विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषा संगीताची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version