Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जलसंचयासाठी पाऊस झेला अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात मधून आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जून मध्ये पाऊस येईल त्या आधीचे १०० दिवस आपल्या आसपासच्या भागात जलस्रोतांची सफाई, जलसंचयाची तयारी करण्यासाठी सामुदायिक अभियान राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन आजच्या मन की बात मधून केले.

‘Catch the Rain’ अर्थात “पाऊस झेला’’ अभियान, जलशक्ती मंत्रालय लवकरच सुरू करत असून “जेव्हा पडेल तेव्हा, जिथे पडेल तिथे”, पाऊस झेला हा या अभियानाचा मूलमंत्र असेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

तमिळनाडूतल्या तिरूअन्नामलाईतल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न, बुंदेलखंडातले तळ्याचे पुनर्भरण, उत्तराखंडात वनीकरणातून पुन्हा प्रवाहित झालेले जलस्रोत अशा जलसंवर्धनाच्या सामुहिक प्रयासांची नोंद पंतप्रधानांनी आज मन की बात मधून घेतली.

माघ महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते, पाणी जपायला हवे याची जाणीव करून देण्यासाठीच पूर्वजांनी माघाचे नाते, नदीशी जोडले असावे असे सांगून पंतप्रधानांनी २२ मार्चच्या जागतिक जलदिनाचीही आठवण करून दिली.

डॉ. सी.व्ही रमण यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ आज साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नाशिकच्या स्नेहिल यांच्या पत्राचा उल्लेख करून भारताचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

ड जीवनसत्वयुक्त गहु, तांदळाच्या नव्या जाती, जैविक शेतीचे प्रयोग, शेवग्याचे नवे वाण, चिया बीजांचे उत्पादन अशा देशभरातल्या विविध प्रयत्नांची दखल घेत मोदी यांनी विज्ञान असेच शिवारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

देशभरातील वैज्ञानिक प्रयोगांचे दाखले देत प्रत्येकाने अशीच विज्ञानाची कास धरली तर विकासाच्या वाटा खुल्या होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी आजच्या विज्ञानदिनी व्यक्त केला.

आत्मनिर्भर भारत अभियान ही केवळ शासकीय मोहिम नसून राष्ट्राचा आत्मा आहे, आपणच आपले नियंता होणे आहे, या पश्चिम बंगालचे रंजन यांच्या मताशी सहमती दर्शवत स्वदेशीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून केले.

आसामातल्या काझीरंगा अभयारण्यात यंदा जलपक्षांची संख्या १७५% वाढली. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या या घटनेची दखल घेत काझीरंगात पक्षांच्या ११२ प्रजाती आढळल्याची माहिती त्यांनी दिली.

वित्तिय वर्ष संपत असल्याने अनेक जण व्यस्त असले तरी कोरोनासंबंधी काळजी घ्यायला विसरू नका असे आवाहन करत आणि येणाऱ्या सणांसाठी शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातची सांगता केली.

Exit mobile version