इस्रोच्या ‘PSLVC 51’ रॉकेटद्वारे एकाचवेळी १९ उपग्रह अंतराळात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथल्या प्रक्षेपणस्थळावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, म्हणजेच इस्रोच्या PSLVC 51 या रॉकेटचे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले.
या रॉकेटद्वारे ब्राझीलचा अॅमेझॉनिया-१ हा मुख्य उपग्रह आणि इतर १८ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. या उर्वरित १८ उपग्रहांमध्ये स्पेस किड्स इंडियाने तयार केलेला सतीश धवन सॅट आणि तीन महाविद्यालयांनी तयार केलेला युनिटी सॅट या उपग्रहांचा समावेश आहे.
अॅमेझॉनिया-१ उपग्रहाला अवकाशात सोडण्याची ही मोहीम, अवकाश विभागाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या कंपनीची पहिलीच व्यावसायिक मोहीम आहे तर इस्रोचीदेखील यावर्षीची ही पहिलीच मोहीम आहे.
अवकाश क्षेत्रात ब्राझील; भारताबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे ब्राझीलियन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मार्कोस सीझर पोर्टेस यांनी म्हटले आहे.