Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे 

मुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 217 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेडनेट, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी अशी कामे करण्यात येत आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता 111 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 42 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेसाठी 2 कोटी 17 लाख रुपये वितरित करण्यात आले असून 5 कोटी 41 लाख रुपये खर्चाची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.

कोकणातील चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने 609 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. कोरोना संकटाच्या काळातही शासनाने फळबाग लागवडीचे काम सुरूच ठेवले असून येत्या वर्षभरात 50 हजार हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

Exit mobile version