Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून काम करावे : हेमराज बागूल

धुळे : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तथा मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल यांनी येथे केले.

भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्यातर्फे आणि जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्या सहकार्याने हॉटेल कृष्णाई येथे वार्तालाप अर्थात माध्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक नितीन सप्रे, ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे उपमुख्य बातमीदार निखिल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

संचालक श्री. बागूल म्हणाले, शासनात लोकसंवाद महत्वाचा आहे. राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान योजना लोकसहभागामुळे यशस्वी ठरत आहे. राज्य शासनाचे कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण याविभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात पाहावयास मिळतील. शासनाचा जनसंपर्क व्यापक व्हावा म्हणून विविध जिल्ह्यात माध्यम प्रतिनिधी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून हा उपक्रम कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे. या माध्यमातून पत्रकारितेत उपलब्ध मनुष्यबळ कुशल होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले, माध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. अन्य लाभार्थ्यांचे आधारकार्ड, बँक खाते याविषयी माहिती अभियानस्तरावर संकलित करण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजनेची सविस्तर माहिती दिली. या मोहिमेविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन केले.

श्री. सूर्यवंशी म्हणाले, विकास पत्रकारितेचे स्वरुप व्यापक आहे. समाजाच्या शेवटच्या घटकातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे सुध्दा विकास पत्रकारितेचे उदाहरण म्हटले पाहिजे. बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरुप बदलत आहे. अशा परिस्थितीत नकारात्मक ऐवजी सकारात्मक आणि समतोल वृत्तांकन विकासाला चालना देवू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या वार्तालापात आशुतोष जोशी, नितीन जाधव, नीलेश परदेशी, सुनील पाटील, ललित चव्हाण यांनी भाग घेतला. पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक श्री. सप्रे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या कामकाजाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, सरकार आणि माध्मय प्रतिनिधी यांच्यातील संवाद वाढावा म्हणून पत्र सूचना कार्यालयातर्फे अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहेत. आतापर्यंत नऊ कार्यशाळा झाल्या आहेत. आगामी काळात तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या संकेतस्थळावर मराठीतून माहिती उपलब्ध होत असते. या माहितीचा माध्यम प्रतिनिधींनी उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.  पत्र सूचना कार्यालयातील माहिती सहायक सोनल तुपे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version