नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Ekach Dheya
मुंबई : राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत मार्च 2022 पर्यंत लातूर मधील नळजोडणीचे काम कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा परिपूर्ण आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा आराखड्यास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक आज ऑनलाईन पद्धतीने वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोयल, आदी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, ग्रामीण जनतेला पिण्यासाठी शाश्वत पाणी मिळावे म्हणून जल जीवन मिशन हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून सुरू करण्यात आला आहे. मात्र गावांमध्ये नळ जोडणी करीत असताना पूर्ण करण्यात आलेल्या नळजोडण्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे याबाबत बाह्यस्त्रोतांकडून ऑडीट करुन घेणेही आवश्यक आहे. जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना वॉटरग्रीड योजनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. जलजीवन मिशन योजनेचे यश तेव्हाच असेल जेव्हा सर्वांना नियोजित पाणी मिळेल. त्यामुळे यासाठी आवश्यक असणारी कामाची गुणवत्ता आणि कालबद्ध नियोजन आवश्यक आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नळ जोडणी करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जल जीवन मिशन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात सुलभता यावी यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याचे प्रस्तावित असून लवकरच याबाबत पूर्तता करण्यात येईल.
आमदार धीरज देशमुख यावेळी म्हणाले की, लातूर जिल्ह्यात दरवर्षी पाऊस कमी पडल्याचे दिसून येते. तसेच तलाव, विहिरीतून होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने बऱ्याच गावांना पाण्याचा पुरवठा होत नाही. येणाऱ्या काळात पाण्याची क्षमता कशा पद्धतीने वाढविता येईल याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी याबरोबरच पाण्याचे स्तोत्र वाढविण्यावरही भर देणे आवश्यक आहे. लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोयल यांनी लातूरमध्ये यावर्षी 92 हजार नळजोडण्यांपैकी 86 हजारहून अधिक नळ जोडणीचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती सादरीकरणादरम्यान दिली.