मुंबई (वृत्तसंस्था) : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आता येत्या २१ मार्च ला होईल असं आयोगानं आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं. १४ मार्च नियोजित ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे काल राज्यभरात उमेदवारांनी संताप व्यक्त केला होता, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत आज या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असं सांगितलं होतं त्याप्रमाणे आज ही तारीख जाहीर करण्यात आली.
१४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरीत करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे, या प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश दिला जाईल.
त्याचप्रमाणे येत्या २७ मार्च ला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेतल्या जातील त्यात कोणताही बदल केलेला नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे.