Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ऋजुता दिवेकर यांचा फिटनेस मंत्र – ‘स्थानिक आहार, वैश्विक विचार’

मुंबई : टपाल खात्याचा चेहरा आणि दूत अशी ओळख असलेला पोस्टमन हा स्वत:ची काळजी न घेता अविरत आपले कर्तव्य बजावत असतो, मात्र पोस्टमनच्या कामाचे स्वरुप, त्याचा धावपळीचा दिनक्रम, तणाव आणि सतत फिरण्याच्या कामामुळे आहाराच्या चुकीच्या सवयींचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. हा विचार करुन पोस्टमन आणि टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहार आणि आरोग्यविषयक जागृती या दृष्टीने मुंबईच्या मुख्य टपाल कार्यालयाने आज ‘फिटनेस मंत्र’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ आणि उदरविकारशास्त्र आशियाई संस्थेचा ‘पोषण आहार पुरस्कार’ विजेत्या ऋजुता दिवेकर यांनी या सत्रात आरोग्य आणि उत्तम आहाराविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पोस्टमननी आहाराच्या आपल्या पारंपरिक आणि दैनंदिन सवयी कायम ठेवाव्या, असा साधा मात्र उपयुक्त सल्ला त्यांनी दिला. आहाराविषयी खुप गुंतागुंतीच्या डाएटचा विचार न करता, पारंपरिक खाद्य पदार्थ आणि आधुनिक पोषण आहार विज्ञान याचा संगम करुन आपला आहार ठरवावा असे त्या म्हणाल्या. मातीत पिकणारे अन्न म्हणजेच स्थानिक आहार आणि पोषण विज्ञान म्हणजेच वैश्विक विचार याची सांगड घालावी, असा फिटनेस मंत्र त्यांनी श्रोत्यांना दिला.

या सत्रासाठी टपाल खात्याच्या मुंबई विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य आणि आहार विषयक जागृतीसाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते. दिवेकर यांनी दिलेल्या मंत्रामुळे आहारातून आरोग्याची गुरुकिल्ली सापडल्याचा आनंद सर्व श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Exit mobile version