मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबाबतची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचं पालन करावं, आणि कडक लॉकडाऊन करायला भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन संवाद साधला आणि त्यांना सहकार्याचं आवाहन केलं. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी, डॉ तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.
आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले.
पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.