Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, यासाठीच ‘मेक इन इंडिया’ – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, हा धडा आपण घ्यायला हवा, त्यासाठीच प्रधानमंत्र्यांनी मेक इन इंडिया ही कल्पना मांडली, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत एका खासगी वृत्त समूहानं आयोजित केलेल्या युवा पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

विकसित देशात नाविन्यतेला वाव दिला जातो, त्याचा उपयोग केला जातो म्हणून ते देश समृद्ध होतात असं त्यांनी सांगितलं. देशाच्या प्रगतीसाठी संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रांवर भर देत, युवा प्रतिभा आणि मेहनतीला प्रोत्साहन द्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं.

आपल्याकडे नवे शोध लावणारा युवा वर्ग  आहे, पण त्यांना आणि त्यांच्या शोधांचा स्वीकार करणारी सामाजिक मानसिकता घडायला हवी अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

बुद्धिमत्ता ही आपली ताकद आहे, फक्त तिचा वापर दुसरीकडे होतो, तो आपल्या देशासाठी व्हायला हवा असं त्यांनी नमूद केलं. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते संशोधन, सामाजिक कार्य, नवउद्यमी, व्यवसाय, कला आणि मनोरंजन, कायदा सुशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या युवकांना पुरस्कार देऊन गौरवलं गेलं.

Exit mobile version