मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची RAT अर्थात रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचा आदेश मुंबई महानगरपालिकेनं जारी केला आहे.
रेल्वे प्रशासनानं दिवसाला किमान एक हजार प्रवाशांची सरसकट पद्धतीनं RAT चाचणी करावी असं यात म्हटलं आहे.
तसंच मुंबईतले सर्व मॉल्स, बाजार आणि पर्यटन स्थळांवर येणाऱ्या नागरिकांची कुठल्याही परवानगी शिवाय RAT चाचणी होणार असून चाचणीला नकार देणाऱ्यांविरोधात १८९७ च्या साथ रोग कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल.
मॉल्स मध्ये होणाऱ्या रॅपिड अँटीजेन चाचणीचं शुल्क संबंधित व्यक्तीला भरावं लागेल, तसंच अन्य ठिकाणी होणाऱ्या चाचण्यांचा खर्च मुंबई महानगरपालिका करणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.