Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

या निमित्तानं केन बेटवा जोड प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येणार आहे.नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन बेटवा लिंक हा पहिला प्रकल्प असेल. या प्रकल्पामध्ये दौधन धरण बांधून आणि दोन्ही नद्यांना जोडणाऱ्या कालव्याद्वारे केन नदीतून बेटवा नदीत पाणी स्थानांतरित करण्याचा उद्देश आहे.

याद्वारे १० लाखहून अधिक हेक्टरवर वार्षिक सिंचन, सुमारे ६२ लाख लोकांना पिण्याचे पाणी आणि १०३ मेगावॉट जलविद्युत निर्मिती करण्यात येईल. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रचंड लाभ होणार आहे. यातून नदी जोडण्याच्या अनेक प्रकल्पांसाठी मार्ग तयार होऊन देशाच्या विकासात अवर्षण हा अडथळा ठरणार नाही.जल शक्ति अभियानः पावसाला पकडा ही मोहीम शहरी तसेच ग्रामीण भागात देशभरात हाती घेण्यात येईल. जिथे पडेल, जेव्हा पडेल तेव्हा पावसाला पकडा, अशी या मोहिमेची मध्यवर्ती संकल्पना असून आजपासून ३० नोव्हेंबरपर्यंत देशभरात ती राबविण्यात येईल.

लोकांच्या सहभागातून जल संवर्धनाचे काम तृणमूल स्तरापर्यंत नेण्यासाठी जन आंदोलन म्हणून ती सुरु करण्यात येईल. निवडणूक होऊ घातलेली राज्ये वगळता, प्रत्येक जिल्हयाच्या सर्व ग्राम पंचायतींमध्ये आज ग्राम सभा घेण्यात येतील आणि पाणी आणि पाणी संवर्धनाशी मुद्यांवर चर्चा करण्यात येईल. यासाठी ग्राम सभांमध्ये जल शपथ देखील घेण्यात येईल.

Exit mobile version