दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक
Ekach Dheya
मुंबई: वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत खरेदी करणाऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास खरेदीवर भरलेल्या वस्तू व सेवाकराची वजावट त्याला विक्रीवरील करदेयतेमधून मिळत असते. या सवलतीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी खोट्या आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे वस्तू व सेवा कर कायद्याखाली नोंदणी दाखला प्राप्त करून प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता जवळपास दोनशे कोटी रुपयांची खोटी बिले देऊन शासनाची 39 कोटी रुपयांची फसवणूक केली.
खोटी बिले देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ग्लान्स ट्रेडिंग, मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसेस, मे. आर. के. ट्रेडिंग, मे. एडविन एन्टरप्राइसेस, मे. सायरस एन्टरप्राइसेस आणि मे. अल्फा एन्टरप्राइसेसचे प्रकरण पुढील तपासासाठी राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. या प्रकरणात दि. 22 डिसेंबर 2020 रोजी अन्वेषण भेट देण्यात आली. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की करदाता मे. ग्लान्स ट्रेडिंगचे मालक विलास केरू मोहिते, मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसचे मालक राम शंकर तुपट, मे. आर. के. ट्रेडिंगचे मालक राजकुमार सियाराम भुल्लू सरोज, मे. एडविन एन्टरप्राइसेसचे मालक थीयागराजन गुरुस्वामी नायडू, मे. सायरस एन्टरप्राइसचे मालक सुरेंधर सुब्रमनियम देवेंदर आणि मे. अल्फा एन्टरप्राइसेसचे मालक हसन महम्मद हुसेन तांबोळी यांनी प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता एकूण १९० कोटी रुपयांची बिले तेलंगणा आणि इतर राज्यातील व्यापाऱ्यांना खोटी वजावट उपलब्ध करून दिली.
नोंदीत व्यवसायाच्या ठिकाणी या व्यक्ती कोणताही व्यवसाय करीत नसल्याचे आढळले किंवा काही व्यवसायाची नोंदणी बनावट कागदपत्रांच्या आधारे खोट्या पत्त्यावर घेतल्याचे आढळले.
या प्रकरणात मे. ग्लान्स ट्रेडिंगकडे कोणताही आयटीसी उपलब्ध नसताना त्यांनी मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसला खोटी बिले वितरित केली आणि कोट्यवधी रुपयाची कर वजावट उपलब्ध करून दिली. यापुढे मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसेसने मे. आर. के. ट्रेडिंग, मे. एडविन एन्टरप्राइसेस, मे. सायरस एन्टरप्राइस आणि मे. अल्फा एन्टरप्राइसेस यांना खोटी बिले देऊन कर वजावट स्थानांतरित केली व या चौघांनी आंतरराज्यीय व्यवहार दर्शवून इतर राज्यातील व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची खोटी बिले देऊन वजावट उपलब्ध करून दिली.
सहाही प्रकरणामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदीचे उल्लंघन करून वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय रु. १९० कोटी रुपयांचे बनावट बिले देऊन आणि रु. ३९ कोटी रुपयाचा वस्तू व सेवाकर त्याच्या इतर राज्यातील प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित केला असून रु. ३९ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच सहा करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदीचे उल्लंघन करुन वस्तूंचा पुरवठा न करता बीजक किंवा बिल जारी करून शासनाची महसूल हानी केली आहे. विलास केरू मोहिते, राम शंकर तुपट, राजकुमार सियाराम भुल्लू सरोज, थीयागराजन गुरुस्वामी नायडू, सुरेंधर सुब्रमनियम देवेंदर आणि हसन महम्मद हुसेन तांबोळी यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दि. 23 मार्च 2021 रोजी अटक केली असून न्यायालयाने विलास केरू मोहिते, राम शंकर तुपट, थीयागराजन गुरुस्वामी नायडू, सुरेंधर सुब्रमनियम देवेंदर आणि हसन महम्मद हुसेन तांबोळी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे तर राजकुमार सियाराम भुल्लू सरोज यांना करहानी रु. ५ कोटी पेक्षा कमी असल्याने वस्तू व सेवा कर कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून वैयक्तिक जामीन देण्यात आला.
वरील प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याचा संशय महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक आयुक्त श्रीमती पूनम ओंबासे, सहायक आयुक्त उत्तम बोधगिरे, सहायक आयुक्त जनार्दन आटपाडकर, सहायक आयुक्त नंदकुमार दिघे, सहायक आयुक्त सुहास गावडे, सहायक आयुक्त संजय म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले असून उप आयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. तपासासाठी सहआयुक्त, अन्वेषण-अ, ई. रवीन्द्रन यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.