Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नवी मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद; महालक्ष्मी सरस प्रदर्शनात चार दिवसांत ३५ लाखांची उलाढाल

मुंबई : नवी मुंबईत आयोजित अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनास अवघ्या चार दिवसात 35 लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला यांनी दिली.

या प्रदर्शनातील सप्तश्रृंगी स्वयंसहाय्यता समूह कोथळी जि.नंदूरबार या गटाची उत्पादने देशी गाईचे तूप, रोस्टेड गहू,मसाले, असून आजपर्यंत 70 हजाराची विक्री या समूहाची झाली आहे. राणी लक्ष्मीबाई महिला स्वयंसहाय्यता समूह भाडजी ता.खुलताबाद जि.औरंगाबाद या समूहाची उत्पादने राजगिरा चिक्की, खोबरा चिक्की, तीळ चिक्की असून 66 हजार रुपयाची विक्री झाली आहे. प्रगती स्वयंसहाय्यता समूह सरमकुंडी ता.वाशी जि.उस्मानाबाद या समूहाची उत्पादने एकूण 12 प्रकारचे मसाले, कुरडई, पापड, शेवया, सांडगे, सेंद्रिय गुळ हे असून आजपर्यंत 56 हजार रुपयाची विक्री झाली आहे. ओम साई महिला स्वयंसहाय्यता समूह जाणवली ता.कणकवली जि.सिंधुदूर्ग या समूहाची उत्पादने मालवणी मसाला, मच्छी मसाला, वडे पीठ, लाल पोहे, कोकणी उत्पादने असून 64 हजार रुपयाची विक्री झाली आहे. पंचशील स्वयंसहाय्यता समूह तरवळ जि.रत्नागिरी या समूहाची उत्पादने काजू, कोकम, फणस गरे, असून आजपर्यंतची विक्री 1 लाख 47 हजार विक्री झाली आहे.

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध राज्यातून स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण कारागीर सहभागी झाले असून यामध्ये 120 स्टॉल असून त्यामध्ये 20 खाद्यपदार्थ स्टॉल आहेत. या सर्व स्टॉलची आजपर्यंत सुमारे 35 लाखाची विक्री झाली आहे.

मागील  दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे 8 हजार स्वयंसहाय्यता समूहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्या वर्षी 50 लाखाची आर्थिक उलाढाल झाली होती. तर मागील वर्षी जवळपास 12 कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला आहे. महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांबरोबर इतर राज्यामधून अनेक विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामीण कारागीर आतापर्यंत सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत 4 लाख स्वयंसहाय्यता गटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून 43 लाख कुटुंबाना अभियानाशी जोडण्यात आले आहे. अभियानामार्फत जवळपास 520 कोटी समुदाय  निधी तर बँकामार्फत 5 हजार 250 कोटीचे कर्ज गटांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अभियानांतर्गत 7.50 लाख  कुटुंबानी उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले असून त्यामाध्यमातून जवळपास 645 कोटींचे उत्पन्न निर्माण झाले आहे. गावपातळीवर 50 हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्य करत आहेत.

दररोज  सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आहे. दि. 30 ऑगस्ट 2019 पर्यंत असणा-या आगरी-कोळी सांस्कृतिक भवन, सेक्टर-24, पामबीच रोड, नेरुळ, नवी मुंबई येथील या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन साहित्याची खरेदी करावी, असे आवाहन श्रीमती आर.विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी केले आहे.

Exit mobile version