Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे – कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी  उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची जबाबदारी असल्याचे, कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.

मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री डॉ.बोंडे यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी बियाणे कशा प्रकारे महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात याची माहिती दिली. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.

कृषिमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. राज्य शासनामार्फत विविध उपाययोजनांद्वारे त्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र शेतीसाठी महत्त्वाचे असलेले बियाणे हे सकस आणि गुणवत्तापूर्ण असल्यास त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होतानाच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही पर्यायाने वाढ होईल. यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन करतानाच राज्यात बियाण्यांच्या संशोधनाला अधिक वाव दिला जाईल, असेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उत्पादक कंपन्यांनी जीएम तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सादरीकरण केले. राज्यातही जीएम बियाणे वापरण्यास मंजुरी देण्यासाठी शिफारस करण्याची विनंती यावेळी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्र्यांना केली.

जीएम तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. राज्यात बियाणे आणि कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस कृषी आयुक्त सुहास दिवसे,सहसचिव गणेश पाटील, बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version