Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोविड प्रतिबंधक निर्बंधांमधे १५ एप्रिल पर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  राज्यभरात १५ एप्रिल पर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जमावबंदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये, तर मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल. आज साजरा होणारा होलिकोत्सव, आणि उद्यापासून पुढे आठवडाभर येणारे शब ए बारात, धुलिवंदन, गुडफ्रायडे, ईस्टर संडे, वगैरे सण साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. काल उशिरा गृहविभागानं यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, शारीरिक अंतराच्या नियमाचं तंतोतंत पालन होईल याकडे लक्ष द्यावं, मोठ्या स्वरुपाचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.सभागृह चालकांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यकार्यक्रमांना सभागृह भाड्यावर द्यायला मज्जाव केला आहे. पोलिस प्रशासन, तसंच स्थानिक प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना, या पत्रकातून केल्या आहेत.

Exit mobile version