पुणे : पुणे, फलटन मार्गावरच्या डेमू-ट्रेनला आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चंद्रकांत पाटील तसंच अनेक मान्यवर सहभागी झाले होते. फलटण- पुणे गाडी ही सुरुवात आहे. यापुढेही रेल्वेमधे अनेक सुधारणा होणार आहेत, असं यावेळी जावडेकर यांनी सांगितलं.
रेल्वेचं पूर्ण चित्र बदललं आहे, रेल्वेस्थानकं अद्यावत होण्याकडे लक्ष पुरवलं जात आहे. देशातली वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून त्यानुसार रेल्वेतल्या विकासाच्या कामांना गती मिळत आहे, असं जावडेकर म्हणाले. IRCTC द्वारे रेल्वे तिकिटाचं बुकिंग आणि रद्द झालेल्या तिकिटाचा परतावा मिळवणं आता सोपं झालं आहे. तसंच मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटना पूर्णपणे थांबलेल्या आहेत, कारण मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ऐवजी आपण आता पर्यायी व्यवस्था देणं सुरू केलं आहे.