नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आशा भोसले, मोहनलाल, विश्वजीत चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या मान्यवरांनी ही निवड केली आहे. रजनीकांत यांनी गेल्या ५० वर्षांपासून भारतीय चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत त्यामुळेच या निर्णयाचा लोकांना नक्कीच आनंद होईल असं जावडेकर म्हणाले. येत्या ३ मे ला या पुरस्काराचं वितरण राष्ट्रीय पुरस्कारांसोबत होणार आहे.
अभिनेते राजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या घोषणेचं देशभरात जोशात स्वागत होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून रजनीकांत यांना आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.रजनीकांत त्यांच्या चित्रपटातील विविध भूमिकांसाठी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे मोदी या संदेशात म्हणाले.