नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या मुद्यावरील आपल्यातील मतभिन्नतेचा दुरुपयोग शेजारी देश आंतरराष्ट्रीय स्तरावर करु शकतो, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.
ते आज आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे कार्यक्रमात बोलत होते. नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारुन दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या सुहृदांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
1964 मध्ये खासगी विधेयकावर झालेल्या चर्चेत सदस्यांनी पक्षभेद विसरुन ते रद्द करण्याची मागणी केली होती, असे सांगून त्याबाबत छापून आलेला वृत्तांत उपराष्ट्रपतींनी दाखवला. कलम 370 रद्द झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये औद्योगिकीकरण, रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांनी आपल्या लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता तयार करावी, असे आवाहन त्यांनी केले. राजकीय नेत्यांविरुद्धचे फौजदारी खटले लवकर निकाली निघावेत, यासाठी विशेष न्यायिक लवाद स्थापन करण्याला त्यांनी समर्थन दिले.
यावर्षी 2 ऑक्टोबरपर्यंत प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाऱ्यालाही उपराष्ट्रपतींनी पाठिंबा दिला.