मराठीच्या जगभर प्रसारासाठी विदेशातील मराठीजनांसाठी स्पर्धा
Ekach Dheya
मुंबई : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे १० मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात भारताबाहेरील रहिवाशांना समाज माध्यमाद्वारे (सोशल मीडिया) सहभागी होता येणार आहे. त्यासाठीची अंतिम तारीख २७ एप्रिल २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असून स्पर्धकांना आपला सहभाग नोंदविता येणार आहे.
या स्पर्धेच्या निकालाची घोषणा महाराष्ट्र दिनी, दि. १ मे २०२१ रोजी करण्यात येणार आहे. ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. जर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व्यवस्थित झाले, तर न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन डीसीमध्ये हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभागाने दिली आहे. या स्पर्धेत विदेशातील (भारताबाहेर स्थित असलेले भारतीय नागरिक/NRI) नागरिक सहभागी होऊ शकणार आहेत.
स्पर्धेचे स्वरूप
फेसबुक पोस्ट, चलचित्रफीत (व्हिडिओ) – कमीत कमी 1 मिनिट व जास्तीत जास्त 2 मिनिटामध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफीत/व्हिडिओ.
निबंध : 1000 ते 1500 शब्दात मराठी भाषेबद्दल निबंध,
ट्विटर – चलचित्रफीत : ट्विट स्वरूपात कमीत कमी 1 मिनिट व जास्तीत जास्त 2 मिनिटामध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफीत/व्हिडिओ,
ट्विट : मराठीबद्दल एक ट्विट.
मराठी भाषेबद्दल या सर्व माध्यमातून व्यक्त व्हायचे आहे.