आणखी पन्नास व्हेंन्टीलेटर खरेदी करा : ॲड. नितीन लांडगे
Ekach Dheya
वाढती रुग्ण संख्या पाहता भोसरीत जम्बो कोविड रुग्णालय ताबडतोब सुरु करा : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कोविड – 19 ची वाढती रुग्णसंख्या पाहता आयुक्तांनी स्व:ताच्या अधिकारात व्हेंन्टीलेटर ताबडतोब खरेदी करावेत अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी 9 एप्रिल रोजी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार 50 व्हेंन्टीलेटर खरेदी करण्यात आले, परंतू रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. त्यासाठी आणखी 50 व्हेंन्टीलेटर खरेदी करावेत, तसेच आणखी ऑक्सीजन बेडची व्यवस्था तातडीने करावी. वाढती रुग्ण संख्या पाहता भोसरीमध्ये दुसरे जम्बो कोविड रुग्णालय ताबडतोब सुरु करावे अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सोमवारी (दि. 12 एप्रिल) आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत केली.
आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक राहुल कलाटे, शत्रृघ्न काटे, शशिकांत कदम, मोरेश्वर भोंडवे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे तसेच डॉ. पवन साळवे, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे आणि ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले की, वायसीएम रुग्णालयाबरोबरच भोसरीतील नविन रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, आकुर्डी आणि थेरगाव येथिल रुग्णालयात पुढील आठ दिवसात व्हेंन्टीलेटर आणि ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी. शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. यावर देखिल उपाययोजना करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
यावेळी आयुक्तांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात दाखल असणा-या कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक तेवढ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे. आगामी दोन दिवसात शहरातील खाजगी रुग्णालयांतील कोरोनाच्या रुग्णांसाठी देखिल रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल. तसेच इतर रुग्णांसाठी देखिल इंजेक्शन पुरवठा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल. पुढील आठ दिवसात नविन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालयात देखिल व्हेंन्टीलेटर व ऑक्सीजन बेडची सुविधा वाढविण्यात येईल. रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता आणखी मिनी जम्बो कोविड हॉस्पिटलची गरज भासणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले की, भोसरी येथे सुरुवातीपासूनच कोरोना तपासणी केंद्र आहे. नविन भोसरी रुग्णालयात सुरवातीपासून कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचा हजारो रुग्णांना उपयोग झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावरील तालुक्यांमधील नागरिकांसाठी भोसरी हे ठिकाण दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. आता देखिल वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात भोसरी, चऱ्होली, चिखली, डूडूळगांव, मोशी, तळवडे या भागातील नागरिकांबरोबरच पुणे – नाशिक महामार्गावरील ग्रामिण भागातील नागरीक उपचारासाठी दाखल असण्याचे प्रमाण जास्त आहे. येथे रुग्णांची संख्या देखिल जास्त आहे. त्यामुळे दुसरे जम्बो कोविड हॉस्पिटल भोसरी गावजत्रा मैदानात उभारले तर ते जास्त सोयीस्कर होईल. याचा आयुक्तांनी प्राधान्याने विचार करावा. अशीही मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केली.