Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप  अत्याधुनिक धोरण आहे असं सांगत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिक्षण धोरणाची प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्र्यांनी आज देशातल्या विद्यापीठांच्या संघटनेच्या ९५ व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते.

प्रसिद्ध शिक्षण तज्ञ माजी राष्ट्रपती डॉ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या दृष्टीकोनानुसार हे धोरण असून, संस्थात्मक आणि शिक्षणाच्या बळकटीकरणावर  केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. असं ते म्हणालें, युवा वर्ग आणि त्यांच्या कौशल्यावर विशेष लक्ष देण्याच्या आवश्यकतेवर भर देत प्रधानमंत्री म्हणाले की, युवा वर्गाच्या सक्रिय योगदानातूनच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं.

युवकांना उत्कृष्ट कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी, केंद्र  सरकार देशातल्या विविध भागात कौशल्य संस्था स्थापन करत आहे, असं त्यांनी सांगितलं. भारत आणि देशातील नागरिकांना शांतता आणि यशस्वीतेच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या  शिकवणीमुळे मदत मिळाली आहे याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला.

भारतीय राज्यघटनेचा पाया बळकट करण्याचं श्रेय डॉ. आंबेडकर यांना जातं, राज्य घटनेच्या बळकट पायामुळे लोकशाहीत भारताच्या शाश्वत विश्वासाला आणखी मजबूत केलं आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी किशोर मकवाना लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चार पुस्तकांचं प्रकाशन केलं.

Exit mobile version