नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी ची परिक्षा रद्द केली असून इयत्ता १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली आहे. पुढच्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या मात्र कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या रद्द कराव्या अशी मागणी अनेक राज्यांनी केली होती.
त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीनंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहिर केला.
१० वीच्या परिक्षेचा निकाल मंडळाद्वारे ठरवल्या जाणाऱ्या वस्तूनिष्ठ निकषाच्या आधारे तयार केला जाईल. तर १२ वीच्या परिक्षांच्या नव्या तारखांबाबत येत्या १ जूनला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.