Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. यंदाच्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने 6,813 कोटींच्या मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला असून हा निधी मिळण्यापूर्वीच राज्याने मदतकार्याला सुरूवातही केली आहे.

ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाऊस पडल्याने नद्यांनी आपली पूररेषा ओलांडली होती. त्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. बाधित पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात10 हजार आणि शहरी भागात 15हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत असून पशुधन खरेदी, घर बांधकामांसह विविध उपाययोजनांसाठी 6813 कोटी रूपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. केंद्र शासनाकडून निधी मिळण्याची वाट न बघता राज्य शासनाने आपले मदत कार्य सुरू ठेवले असून आज केंद्रीय पथकाकडून या भागाची पाहणी करण्यात येणार आहे. या सात सदस्यांमध्ये कृषी विभागाचे आर. पी. सिंग, व्यय विभागाचे चित्तरंजन दास,ऊर्जा विभागाचे श्री. ओमकिशोर, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संजय जैसवाल, ग्रामीण विकास विभागाचे व्ही. पी. राजवेदी आणि जल शक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे. हे पथक पूरग्रस्त भागाची चार दिवस पाहणी  करणार आहे.

Exit mobile version