Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही, केंद्रसरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही अशी ग्वाही केंद्रसरकारने दिली आहे. सध्या देशात ५० हजार टनांपेक्षा जास्त ऑक्सीजन साठा असून दररोज नव्यानं ७ हजार टन निर्माण करण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं दिली आहे.

ऑक्सीजनची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यसरकारांनी तारतम्यानं त्याचा वापर करावा आणि अपव्यय टाळावा तसंच जिल्हावार पुरवठा करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करावं, असंही आवाहनही केंद्रसरकारनं केलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि दिल्ली या राज्यांकडून सर्वात जास्त मागणी होत असून त्यांची गरज भागवण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचं नियोजन सरकार करत आहे.

त्याअंतर्गत पोलादनिर्मिती प्रकल्पांकडचा अतिरिक्त ऑक्सीजन वापरला जात आहे. ऑक्सीजनची मागणी पूर्ण करता यावी याकरता निर्मितीक्षमता वाढवण्याबरोबरच इतरही उपाययोजना त्यासंदर्भातल्या सक्षम गटानं सुरु केल्या आहेत.

Exit mobile version