मुंबई (वृत्तसंस्था) : ब्रेक दि चेन मधल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसंच पोलीस अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असं सांगून मुख्यमंत्र्यांमी राज्यातल्या जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहायला सांगितलं.
राज्य शासनानं दुर्बल घटकातल्या गरीब लोकांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोचावी तसंच कोणत्याही तक्रारी येणार नाहीत यादृष्टीनं चांगलं नियोजन करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथं नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनानं बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
ऑक्सिजनचा उचित वापर तसंच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. तसंच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळं लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावं, सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेनं पूर्ण करून घ्यावं, त्यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या सूचना मांडल्या.