Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इमाव आणि विजाभज विकास महामंडळाच्या ऑनलाईन सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इमाव आणि विजाभज कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे, प्रधान सचिव जे पी गुप्ता आणि आयसीआयसीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इमाव आणि विजाभज संवर्गातील युवकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. त्याच बरोबर या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांसंदर्भांतील अर्ज ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत.

इमाव आणि विजाभज या महामंडळाच्या माध्यमातून या संवर्गातील युवती आणि युवकांच्या विकासासाठी विविध योजना निर्माण केल्या गेल्या आहेत. मात्र या महामंडळाची कार्यालयीन यंत्रणा अपुरी असल्याने लाभार्थींना योग्य वेळेत लाभ मिळण्याच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. यातून मार्ग काढत मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दोन्ही महामंडळाला ऑनलाईन सेवेची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या युवक आणि युवतींना या महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी व त्यासोबत अर्ज करण्यासाठी सुलभता व्हावी अशी मागणी होत होती. या महामंडळाच्या सर्व योजना संगणीकृत केल्या आहेत. या ऑनलाईन सेवेमुळे अर्जदारांना प्रत्यक्षात कार्यालयात न जाता कर्जासाठी कोणत्याही ठिकाणाहून अर्ज करता येणार आहे.

अर्जदाराने अर्ज केल्यावर त्या संदर्भात त्यांच्या मोबाईलवर लघु संदेश प्राप्त होणार आहे. याशिवाय वेळोवेळी अर्जदाराच्या अर्जाची सद्यस्थिती तपासात येणार आहे. ही सुविधा नि:शुल्क राहणार आहे.

इतर मागासवर्ग (ओबीसी) संवर्गातील युवक व युवतींसाठी www.msobcfdc.org तर विजाभज संवर्गातील युवक युवतींसाठी www.vjnt.in या संकेतस्थळावरून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Exit mobile version