Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ राखावा, ऑक्सीजनची आंतरराज्य वाहतूक विना अडथळा व्हावी तसंच मेडीकल ऑक्सीजनचं उत्पादन वाढवावं, अशा सूचना प्रधानमंत्र्यांनी दिल्या.

कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १२ राज्यांमधे ऑक्सीजन पुरवठ्याची स्थिती गंभीर असून तिथं येत्या २० तारखेपर्यंत ४ हजार ८८० मेट्रिक टन ऑक्सीजन पुरवला जाणार आहे.

ऑक्सीजन उत्पादन क्षमतेविषयी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. २५ एप्रिलपर्यंत ५ हजार ६१९ तर ३० एप्रिलपर्यंत ६ हजार ५९३ मेट्रिक टन पुरवठ्याची तरतूद आहे, असं त्यांनी सांगितलं.

पोलाद प्रकल्पांकडचा अतिरिक्त ऑक्सीजनही स्वच्छतेची पुरेशी काळजी घेउन वापरण्यात येत आहे तसंच ऑक्सीजन सिलेंडर्स भरणारे कारखाने २४ चालवायला सरकारने परवानगी दिली आहे. गरजेनुसार ऑक्सीजनची आयात करण्याचे प्रयत्नही सुरु असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.भारतीय रेल्वेनं द्रव रूपातल्या वैद्यकीय ऑक्सिजनची रो-रो स्वरूपात वाहतूक करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे. भारतीय रेल्वे लवकरच या ऑक्सिजन भरलेल्या क्रायोजनिक टँकर ट्रकची वाहतुक देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात करणार आहे.

महाराष्ट्र सरकारनं याबाबत मागणी केल्यामुळे रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. या वाहतूक सेवेच्या माध्यमातून क्रायोजनिक कंटेनर ट्रक हे रेल्वे वाहतुकीद्वारे जवळच्या शहरात पोचवले जाणार असून तिथून त्यांची वाहतूक जवळच्या रुग्णालयात तसंच वैद्यकीय सेवा सुविधा केंद्रांत केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करायला यामुळे मदत होणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.

Exit mobile version