Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अंजुमन ए इस्लाम शैक्षणिक संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची अकादमी निर्माण करावी – राज्यपाल चे. विद्यासागर राव

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत अंजुमन-ए-इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या 145 व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

मुंबई : यंग इंडियाचे स्वप्न साकार होत असताना भारतामध्ये चांगल्या शिक्षकांची आवश्यकता पूर्ण होणे आवश्यक आहे. अंजुमन -ए-इस्लाम या शैक्षणिक संस्थेने येणाऱ्या काळात चांगल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची अकादमी निर्माण करावी, जेणेकरुन चांगल्या शिक्षकांची कमतरता दूर करण्यास मदत होईल असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजुमन ए इस्लाम या शैक्षणिक संस्थेच्या 145 व्या वर्षानिमित्त षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शालेय शिक्षण व क्रीडामंत्री ॲड.आशिष शेलार, अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी, विधान परिषद सदस्य हुस्नबानो खलिफे, माजी मंत्री नवाब मलिक, महिला विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल यावेळी म्हणाले, ‘आधुनिक व इस्लामिक शिक्षण’ या माध्यमातून मुस्लिमांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ही शैक्षणिक संस्था काम करीत आहे. अंजुमन ए इस्लामची स्थापना झाल्यानंतर गेल्या 145 वर्षात मुस्लिमांचे शैक्षणिक उत्थान करण्याचे काम या संस्थेने केले आहे. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी आपल्या संस्थेने येणाऱ्या काळात अधिक प्रयत्न करावेत. हे करीत असताना या समाजाच्या मुला-मुलींना शिक्षण, रोजगार आणि इतर क्षेत्रातील फायदा मिळवून देण्यासाठी काय करता येईल यासाठीही नियोजन करावे.अंजुमन ए इस्लाम संस्थेने मुंबईत विद्यार्थी, मुली आणि नोकरदार महिलांसाठी शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वसतिगृह निर्माण करावीत.

केवळ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांना वैविध्यपूर्ण कौशल्ये, तांत्रिक कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये देणेही आवश्यक आहे. जगातील सर्वोत्कृष्ट कुशल लोकसंख्या तयार होणे आवश्यक आहे. आपण सध्याच्या जागतिक कलाबाबत जागरूक असले पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात नोकऱ्या कमी होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण, कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणाद्वारे राष्ट्र निर्माण आणि सबलीकरणाच्या कार्यात विविध प्रकारे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले की, अंजुमन-ए-इस्लामचे संस्थापक खरोखरच दूरदृष्टीचे होते. त्यांनी अंजुमनच्या सुरुवातीच्या वर्षांत कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचा विचार केला. गेल्या 145 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेच्या 90 हूनअधिक शैक्षणिक आणि समाजसेवी संस्था आहेत. या संस्थेने देशाला – डॉक्टर, अभियंते,लोकसेवक, समाज सुधारक, कर्तृत्ववान नेते असे सर्व क्षेत्रातील दिगग्ज मंडळी दिली असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

पुढची तीन ते चार दशके भारतासाठी सर्वात महत्वाची ठरणार आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश बनणार आहे. त्यावेळी आपल्या भारतीयांचे सरासरी वय 29 वर्षे असेल, जे अमेरिकन किंवा चीनपेक्षा जवळजवळ8 वर्षे लहान असतील. पुढील दशकांमध्ये आता भारताला हीच तरुण शक्ती मानवी संसाधनात प्रतिबिंबित करावयाची आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सक्षम बनविण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात नमूद केले.

शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणले, केवळ अंजुमनसाठी नव्हे, तर मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्यासाठी हा गौरवशाली क्षण आहे. शिक्षण, कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणाद्वारे  महत्त्वपूर्ण योगदान  अंजुमन-ए-इस्लामने दिले आहे.

अंजुमन संस्था अभियांत्रिकी, औषध,व्यवसाय व्यवस्थापन, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग आणि इतर विषयांसह विस्तृत विषयांचा अभ्यासक्रम सामावून शिक्षण देते.अंजुमन संस्था वर्षाकाठी जवळपास एक लाख विद्यार्थ्यांचे जीवन आणि करियर घडवते ही बाब उल्लेखनीय आहे.आणि आता येणाऱ्या काळात लॉ कॉलेज सुरु होत असल्याचा आनंद आहे.

गेल्या 145 वर्षाच्या काळात या संस्थेने आपले वेगळेपण  सिद्ध केले आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली  राहिला असून येणाऱ्या काळातही ही संस्था एकात्मिक विकास साध्य करेल असा विश्वास वाटतो. या संस्थेने येणाऱ्या काळात उर्दू शिक्षक चांगले मिळावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version