Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचं आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झालं त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या फुफ्फुसाच्या विकारानं आजारी होत्या.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे.

सुमित्रा भावे यांनी पदवीनंतर मुंबईतल्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून  ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली होती. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचं ठरवल्यानंतर त्या अपघातानंच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version