नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सध्याचे कठोर निर्बंध, ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची कमी संख्या आणि लसीकरण केंद्रावरच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका पहाता घरी जाऊन लस देणं योग्य ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच जगभरात प्रभावी अस्त्र ठरलं आहे, हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटना यांची मदत घेऊन वेगानं लसीकरण करावं असं पटोले यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.