Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन करावे – उपसभापती नीलम गो-हे

पुणे : आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता शहर व जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेने अधिक काटेकोरपणे नियोजन करावे, अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी दिले.

पुणे शहर व ग्रामीण रस्ता सुरक्षेसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव व इतर सणांचा कालावधी लक्षात घेता वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगून उपसभापती गो-हे म्हणाल्या, गणेशोत्सव कालावधीत शहरात काही ठिकाणी सायंकाळच्या वेळी गर्दी वाढते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा सतर्क ठेवावी.
सर्व्हिस रोडची दुरूस्ती करण्याच्या सूचना देत गो-हे म्हणाल्या, पुणे शहरात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करा, राज्याच्या इतर भागातून येणा-या बस वाहतुकीसोबतच इतर वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राम यांनी रस्ते सुरक्षेसाठी मागील पाच वर्षात अनेक उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना वाहतुकीची अडचण होणार नाही यादृष्टीने वाहतुकीचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी पुणे शहर व ग्रामीण रस्ता सुरक्षेसबंधी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version