Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोस्टल रोडच्या कामाची प्रगती, मान्सुनपूर्व कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) कामाच्या प्रगतीचा आज राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी मान्सुनपूर्व कामाच्या तयारीचीही यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी माहिती घेतली. पावसाळ्यातही सागरी किनारा मार्गाची कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या अनुषंगाने कोस्टल रोड टीम तसेच मुंबई महापालिकेच्या सी, डी आणि जी – दक्षिण वॉर्डच्या सहायक आयुक्तांना यावेळी निर्देश देण्यात आले.

ऑनलाईन झालेल्या या बैठकीस संबंधीत महापालिका अधिकारी, अतिरिक्त आयुक्‍त (पू.उ.), प्रमुख अभियंता (किरप्र) तसेच सी, डी व जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त उपस्थित होते.

याबैठकीत सागरी किनारा मार्ग प्रकल्‍पाची प्रगती व मान्‍सूनपूर्व कामांचा आढावा याबाबत सादरीकरण करण्यात आले. मान्‍सूनपूर्व कामे करण्‍यात येत असून पावसाळ्यात पाण्‍याचा निचरा होण्‍यासाठी पातमुखे (Outfall), खुला नाला (Open Channel) व पंपींगच्‍या माध्‍यमातून कोठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्‍यात आली आहे. तसेच २४X७ नियंत्रण कक्ष पावसाळ्यात कार्यान्‍वीत करण्‍यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कामाची प्रगती राखण्‍यासाठी कामगार व इतर साधनसामुग्री यांचे योग्‍य ते नियोजन करण्‍यात यावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन निर्धरित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version