नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा झाला.
याची लवकरात लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा अशी सूचनाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे.
देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी भारताच्या लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज नरवणे यांच्यासोबत चर्चा केली. लष्कराच्या वतीनं देशभरात विविध ठिकाणी तात्पुरती रुग्णालयं उभारली जात असल्याची माहिती नरवणे यांनी प्रधानमंत्र्यांना दिली.