‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ
मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य असून भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. भारताने काही क्षेत्रांमध्ये उद्योगस्नेही धोरणे स्वीकारल्यास गुंतवणुकीच्या संधींना अधिक चालना मिळेल, असे प्रतिपादन अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत डेव्हिड रांझ यांनी केले.
नुकताच पदभार स्वीकारलेल्या रांझ यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भारत व अमेरिकेतील संबंध दृढतम असून अमेरिकेने भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र व अमेरिकेमध्ये सहकार्याच्या अमर्याद संधी असून महाराष्ट्रातून फलोत्पादन निर्यातीला देखील मोठा वाव असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.