महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना अटक केले
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. टांझानियाच्या दार-ए-सलाम येथून अदिस अबाबामार्गे मुंबईला जाणाऱ्या मटवानाझी कार्लोस अॅडम आणि रशीद पॉल स्युला यांना 22 एप्रिल 2021 रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने अटक केली. हे दोघेजण काही प्रतिबंधित पदार्थ त्यांच्या शरीरात लपवून आणत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली.
मटवानाझी कार्लोस अॅडम आणि रशीद पॉल स्युला या दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी 22 एप्रिल 2021 रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लानेड, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता आणि या दोघांनाही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, ज्यांनी सरकारी रुग्णालयात या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मटवानाझी कार्लोस अॅडम आणि रशीद पॉल स्युला यांना सर जे.जे. रुग्णालयामध्ये नेण्यात आले आणि तिथे त्यांची एक्स-रे तपासणी केली असता त्यांच्या पोटात काही वस्तू असल्याचे आढळले . त्यानंतर डॉक्टरांच्या निर्देशानुसार कार्लोस आणि राशिद दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. 22 एप्रिल 2021 ते 28 एप्रिल 2021 या रुग्णालयातील सहा दिवसांच्या कालावधीत मुक्कामाच्या दरम्यान, मटवानाझी कार्लोस अॅडम याच्या शरीरातून 54 कॅप्सूल , तर रशीद पॉल स्युला याच्या शरीरातून 97 कॅप्सूल मिळाल्या. 54 कॅप्सूलमधून 810 ग्रॅम वजनाची तर 97 कॅप्सूलमधून 1415 ग्रॅम वजनाची पांढर्या रंगाची पावडर जप्त करण्यात आली आहे. या पांढऱ्या रंगाच्या पावडरची तपासणी केल्यानंतर ती पावडर कोकेन असल्याचे आढळले. अवैध बाजापेठेत 13.35 कोटी रुपये किमतीची कोकेन असल्याचा संशय असलेली 2.225 किलो वजनाची ही पांढरी पावडर एनडीपीएसी अर्थात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा, 1985 च्या तरतुदी अंतर्गत जप्त करण्यात आली.
एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार नोंदवलेल्या जबाबामध्ये मटवानाझी कार्लोस अॅडम आणि रशीद पॉल स्युला यांनी मुंबईसाठी उड्डाण करण्यापूर्वी अनुक्रमे 54 आणि 97 कॅप्सूल गिळल्याचे कबूल केले. दोघांना 29 एप्रिल 2021 रोजी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आणि त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर,मुंबई हजर करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.