नारायण मेघाजी लोखंडे आणि एकशे पाच हुतात्म्यांचे स्मरण कामगार लढ्यासाठी प्रेरणादायी
Ekach Dheya
पिंपरी : भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या एकशे पाच हुतात्म्यांचे आज सर्वांनी स्मरण केले पाहिजे. यांच्या प्रेरणेनेच पुढील काळात कामगार संघटनांचा लढा सुरु राहिल, असे प्रतिपादन हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
शनिवारी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. कदम यांनी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. गुगल मीटव्दारे डॉ. कदम यांनी कामगारांना शुभेच्छा संदेश दिला. यावेळी डॉ. कदम म्हणाले की, 2018 साली केंद्र सरकारने अनपेक्षितपणे लादलेल्या नोटाबंदीमुळे आणि जीएसटीमुळे उद्योगक्षेत्र आर्थिक मंदीचा सामना करीत असतानाच कोरोनाची जागतिक महामारी आली. मागील वर्षापासून अंशता: किंवा पुर्णता: सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे कामगार क्षेत्र उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने प्रचलीत कामगार कायदे रद्द करुन चार कायद्यात भांडवलदारांना पुरक कायदे करण्याचा घाट घातला आहे. हे सुधारीत कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत. यासाठी कामगारांनी एकजूटीने लढले पाहिजे.
कोरोनाबाधित कामगार व त्यांच्या कुटूंबियांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंन्टीलेटर, इंजेक्शन उपलब्ध करुन देणे हि शासनाची जबाबदारी आहे. ‘ब्रेक द चेन’ कालावधीत शासनाचे ज्याप्रमाणे घरेलू कामगार, बांधकाम कामगार यांना मदत दिली आहे. त्याप्रमाणे उद्योग क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांनाही आर्थिक मदत दिली पाहिजे. देशाच्या जीडीपीमध्ये कामगारांचे योगदान मोठे आहे. भांडवलदारांच्या दबावात येऊन केंद्र सरकार कामगारांचे हक्क डावलून कायद्यात बदल करु इच्छित आहे. हे कायदे रद्द करण्यासाठीच आणखी तीव्र लढा उभारण्याचा संकल्प जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करावा, असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.
यावेळी कामगार प्रतिनिधी संतोष पवार, सुरेश संधूर, विजय मोकळे, तानाजी लोखंडे, किरण भुजबळ, विठ्ठल गुंडाळ, राजू मोहिते, सुरेश तरडे, जगन्नाथ हडप, शेखर मांढरे आदींनीही कामगारांना शुभेच्छा दिल्या.