Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एनआयपीएम च्या नॅशनल बिझनेस  क्विझमध्ये पुणे विभागीय फेरीत डॉ. डी. वाय. पाटील  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  स्टडीज महाविद्यालयाचा संघ विजयी

पिंपरी : नॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्यावतीने आयोजित  नॅशनल बिझनेस क्विझच्या पुणे विभागीय स्तरावरील फेरीत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  स्टडीज या महाविद्यालयाचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. तर  प्रथम उपविजेतेपद एम. आय. टी. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या  महाविद्यालयाने पटकावले.

 विजेत्यांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  स्टडीज या महाविद्यालयांचे स्वामिनी लुंगे व पवन वाकेकर हे दोन विद्यार्थी आणि एम. आय.टी. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयांचे जिग्यासा राठी व नेहा खैरे या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तर द्वितीय उपविजेतेपदही डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयाचेच निधी दत्ता व अक्षय जाधव या विद्यार्थ्यानी पटकावले.

विजेत्यांना यावेळी एनआयपीएमच्या पुणे विभागाचे उपाध्यक्ष  व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात  आले.

एनआयपीएम ही मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून संस्थेच्यावतीने दरवर्षी व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर ही प्रश्नमंजुषा स्पर्धा  आयोजित करण्यात येते. व्यवस्थापन शास्त्राचा क्रमिक अभ्यासक्रम  व उद्योगजतातील घडामोडी अशा दोन प्रमुख घटकांवर आधारित ही  प्रश्नमंजुषा असते.

एनआयपीएमच्या पुणे विभागातर्फे चिंचवड येथील यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील फेरीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या फेरीत पुणे जिल्ह्यातील ३० व्यवस्थापन महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. प्रति महाविद्यालय दोन विद्यार्थ्यांचे दोन संघ असे एकूण १२० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

या विभागीय स्तरावरील फेरीत विजयी झालेले दोन्ही संघ आता पुढे होणाऱ्या प्रादेशिक स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरले आहेत, आणि जर त्या फेरीतही विजयी ठरल्यास बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील फेरीत त्यांना सहभागी होता येणार आहे.

व्यवस्थापन शास्त्र शाखेचे हे विद्यार्थी भविष्यात औद्योगिक कंपन्यांमध्ये व्यवस्थापक पदावर रुजू होणार असल्याने त्यांना आत्ता विद्यार्थीदशेतच उद्योगजगताचा आवाका लक्षात यावा, यासाठीच या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात येते असे यावेळी आपल्या मनोगतात बोलताना एनआयपीएमच्या पुणे विभागाचे उपाध्यक्ष  व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी प्रा.सारंग दाणी, डॉ. अमितकुमार गिरी, डॉ. वंदना  मोहांती, प्रा. अमर गुप्ता व  प्रा.सारंग दाणी, यांनी क्विझ मास्टर (प्रश्नकर्ता) म्हणून काम पाहिले.

तर या कार्यक्रमासाठी डॉ. सचिन आंबेकर, प्रा.पुष्पराज वाघ, एनआयपीएमचे वसंत सोमण, यशस्वीचे पवन शर्मा, आदिती चिपळूणकर, अमृता तेंडुलकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version