Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली ऑक्सिजनची गरज वाढत असून केंद्रानं सध्याचा पुरवठा आणखी २०० मेट्रिक टनानं वाढवावा अशी विनंती राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे.

राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्यानं वाढत असून ऑक्सिजनची गरज वाढत आहे हे लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरु करण्यात व्यक्तिशः लक्ष घालावं, अशी विनंती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्राद्वारे केली आहे.

पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्यानं सक्रीय रुग्ण संख्या वाढत असल्यानं ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केलं जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटलं आहे.

सध्या गुजरात जामनगर इथून दिवसाला १२५ मेट्रीक ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यात १०० मेट्रीक टनानं वाढ करून दिवसाला २२५ मेट्रीक टन आणि भिलाई इथून २३० मेट्रीक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे.

भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होईल, आणि रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई आणइ इतर देशांमधल्या तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र सरकारला आयएसओ टॅंकर्स मिळाले आहेत. त्यातले किमान १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून ओडीशातल्या अंगुल इथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणं सोपं होईल, असं या पत्रात म्हटलं आहे.

Exit mobile version