मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व पत्रकारांचं प्राधान्यानं आणि तातडीनं लसीकरण करण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रकार बातमीदारीच्या निमित्तानं सतत घराबाहेर असल्यानं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संसर्गाचा धोका अधिक आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचं तातडीनं लसीकरण करावं, असं थोरात यांनी पत्रात लिहिलं आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही अशीच मागणी केली आहे. कोरोना संकटात प्रशासन आणि जनता यांमधील दुवा म्हणून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धे घोषित करून सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्राधान्यानं लसीकरण करावं, असं शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.