मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असला तरी ही लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असून मराठा समाजानं संयम कायम राखावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यांनी काल राज्यातल्या जनतेला समाजमाध्यमावरुन संबोधित करताना सांगितलं, की आरक्षण देण्याचा अधिकार राज्याचा अधिकार नसून तो राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालायानं स्पष्ट केलं आहे.
आता केंद्र शासनानं, आणि राष्ट्रपतींनी यासंदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या न्याय्य मागणीबाबत संवेदनशीलता दाखवावी, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रश्नी राज्यातल्या सर्व पक्षांची, संपूर्ण राज्याची एकजूट आहे, तसं अधिकृत पत्रही आपण प्रधानमंत्र्यांना देत आहोत आणि यासाठी प्रसंगी आपण प्रधानमंत्र्यांची भेटही घेऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली आहे, त्यावर ज्येष्ठ विधिज्ञ सखोल अभ्यास करत असून यात आणखी काही पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत का याची तपासणी ही केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई लढतांना राज्य शासन कुठेही कमी पडले नाही. उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली होती तेच वकिल सर्वोच्च न्यायालयातही महाराष्ट्राची आणि मराठा आरक्षणाची बाजू मांडत होते. त्यांच्या सोबतीला आणखी उत्तमातल्या उत्तम ज्येष्ठ विधिज्ञांचं सहकार्यही उपलब्ध करून दिलं होतं. हे दिवस आपसात लढण्याचे नाहीत तर एकजुटीने पुढं जाण्याचे आहेत, असं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्रानं गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु केली आहे. यात आरोग्य सुविधा न थांबता वाढवण्याच्या आपण सुचना दिल्या असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारनं १८ ते ४४ वयोगटातल्या लसीकरणाची जबाबदारी राज्यावर टाकली असून यातल्या ६ कोटी लोकसंख्येला दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकदम विकत घेण्याची राज्य शासनाची तयारी असली तरी लस उपलब्ध होण्याला मर्यादा आहे. केंद्र सरकारची ही याबाबत मर्यादा आहे कारण लसीचे उत्पादन हळू हळू वाढत आहे. त्यामुळे जसजशी राज्याला लस उपलब्ध होईल तसतसं या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण केलं जाईल, नागरिकांनी संयम आणि शिस्त पाळावी, असं आवाहन त्यांनी केलं.
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनानं मिशन ऑक्सीजन अंतर्गत स्वावलंबी होण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून रोज ३ हजार टन ऑक्सीजन उत्पादनाच्या दृष्टीनं ऑक्सीजन निर्मिती प्लांट्स उभारले जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही असा चंग राज्यानं बांधला असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.