मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सफाई कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत याबाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषेदत दिली.
श्री.हाथीबेड म्हणाले, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग गेले दोन तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान विविध शासकीय अधिकारी व विविध सफाई कर्मचाऱ्यांच्या संस्था व संघटनांसोबत बैठका आयोजित करण्यात आल्या. सफाई कर्मचारी स्वच्छ भारत मिशनमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावत आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक चांगल्या सोयी-सुविधा पुरविणे हे राज्य सरकारचे काम असून सरकार ते चांगल्या प्रकारे करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या काही समस्या अजूनही आहेत. त्या सोडविण्याबाबत मुख्य सचिव व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या सोबत चर्चा केली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाड-पागे समितीच्या शिफारशीचीही राज्यामध्ये चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी सोडविण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही नियमित होणे आवश्यक असल्याचेही श्री. हाथीबेड यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव,नारायण दास आदी उपस्थित होते.