मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं असून ‘महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ऑक्सिजनची मागणी २ हजार ३०० टन इतकी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी तातडीने ऑक्सीजन निर्मिती आणि साठा वाढवणे, गंभीर त्रुटी शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणे, इत्यादी उपाययोजना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. नागरी कमाल जमीन धारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर एकरकमी दंडात्मक रक्कम तसेच अधिमूल्य रक्कम आकारण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला. त्यानुसार प्रचिलित वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यातल्या दराच्या ३ ते २० टक्के अधिमूल्य एकरकमी आकारले जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी जागेसंदर्भातील अटी शिथील करायला मंत्रीमंडळाने मान्यता दिली
मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टाचार विभागासाठी प्रबंधक आणि मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त प्रबंधक/प्रधान सचिव ही पदं निर्माण करायलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
जिल्हास्तरावर राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
अवकाळी पावसामुळे धानाची नासाडी होऊ नये म्हणून एकवेळची विशेष बाब म्हणून धानाच्या भरडाईकरिता अनुदान मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं या बैठकीत घेतला. त्यासाठी २४४ कोटी रुपये इतक्या रकमेच्या खर्चालाही मान्यता दिली.