मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या कोणत्याही क्षणाला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकू शकतं अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
सध्या हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून अडीचशे ते तीनशे किलोमीटर दूर असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथकं मुंबई आणि गोव्यात तैनात केली आहेत, याशिवाय गरज भासली तर पुणे इथं १४ पथकं संपूर्ण तयारीनिशी सज्ज ठेवली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं १७ तारखेसाठी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरता पिवळा तर पालघर जिल्ह्याकरता हिरवा इशारा जारी केला आहे. या काळात वादळामुळे मुंबई आणि ठाण्यात मुसळधार तर पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
तौक्ते चक्रीवादळ येत्या २४ तासांत अधिक तीव्र होऊ शकतं, त्यामुळे पश्चिम किनारपट्टी लगतच्या बर्याहच भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.