अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तोक्ते चक्रीवादळ उत्तरेला सरकलं
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तोक्ते चक्रीवादळ आज उत्तरेला सरकलं असून ते सध्या पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईपासून सुमारे चारशे किलोमीटर तर गोव्यातल्या पणजी किनारपट्टीच्या पश्चिम नैऋत्यू दिशेला १२० किलोमीटर अंतरावर आहे.
येत्या दिवसभरात या वादळ अधिक तीव्र होईल आणि उत्तरेच्या दिशेकडून संध्याकाळपर्यंत गुजरात किनारपट्टीला पोचेल अशी माहती भारताच्या हवामान विभागानं दिली आहे. हे वादळ येत्या मंगळवारी गुजरातच्या भावनगर जिल्ह्यामधल्या पोरबंदर आणि महुआ किनारा पार करून पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दिव दमण आणि दादरा नगर हवेलीच्या प्रशासक, संबंधित केंद्रीय मंत्रालयं आणि यंत्रणांचे अधिकाऱ्यांसोबत तयारीविषयीची आढावा बैठक घेतली.
चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गृहमंत्रालयानं या सर्व राज्यांच्या किनारपट्टी प्रदेशात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या रवाना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानंही पूर्ण तयारीनिशी त्यांची ४२ पथकं तैनात केली आहेत, तर २६ पथकं सज्ज ठेवली आहेत.
तोक्ते चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीच्या दूरून जाणार आहे, त्यामुळे किनारपट्टी प्रदेशावर त्याचा थेट परिणाम होणार नसला, तरी त्यामुळे येते दोन दिवस समुद्र खवळलेला राहील तसंच मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
आज दक्षिण कोकणात तर उद्या उत्तर कोकणात वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं. यादृष्टीनं आज कोकण किनारपट्टीलगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला, तर उद्यासाठी रायगड जिल्ह्याकरता लाल इशारा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.