मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजने दिली २५० बायपॅप श्वसन उपकरणे
Ekach Dheya
जिल्ह्यांतील कोविड केंद्रांना वाटप सुरु
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग संघटना, व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद दिसत आहे. नुकतेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर, पुणे यांनी २५० बायपॅप श्वसन उपकरणे दिली असून जिल्ह्यांमधील कोविड रुग्णालयांना त्याचे वाटप सुरु झाले आहे. यापूर्वी देखील त्यांनी ३०० बायपॅप आणि ३००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले होते, ज्यांचे वाटप राज्यातील सर्व जिल्ह्यांना झाले आहे. या संस्थेसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच बैठक होऊन त्यात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणांबाबत आवाहन केले होते.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ऑक्सिजन संदर्भातील उपकरणे देण्यात येत आहेत, त्याचाच भाग म्हणून ही बायपॅप उपकरणे देण्यात आली आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन या कोरोना संसर्गाची लढाई ज्या रितीने राज्य शासन लढत आहे त्याबद्दल कौतुक केले असून मराठा चेंबर ऑफ कॉमर्ससारखी समृद्ध वारसा असणारी संस्था या काळात आपले योगदान देण्यासाठी नेहमीच राज्य शासनाच्या बरोबर राहील अशी ग्वाही दिली आहे. वन इंटरनॅशनल सेंटरकडून आणखी १ कोटी रुपये उभे करण्यात आले असून त्यातून आणखी ४४ बायपॅप उपकरणे घेणे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कोविडच्या या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. श्वसनाशी संबंधित विकार वाढल्याने या बायपॅप उपकरणांची उपचारात मदत होत आहे त्यामुळे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर सारख्या संस्थांनी पुढे येऊन केलेली या उपकरणांची मदत निश्चितच महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
जिल्ह्यांमध्ये वाटप सुरु
आरोग्य विभागामार्फत ही बायपॅप उपकरणे राज्यभरातील सर्व जिल्हा आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील कोविड केंद्रांना देणे सुरु झाले आहे.