Site icon साप्ताहिक एकच ध्येय

२६ मे रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘यास चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळ निवळताच भारतीय सागरी क्षेत्रात दुसऱ्या चक्रीवादळाची चाहूल लागली आहे. यावेळचं वादळ अरबी समुद्रावर नसून ते बंगालच्या उपसागरावर तयार होईल आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा देईल.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २१ मे रोजी मान्सून अंदमानात पोहोचेल. लगेच दुसऱ्या दिवशी अंदमान लगत कमीदाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७२ तासात त्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. या चक्रीवादळाचं नाव यास असेल.

ओमान देशानं दिलेलं हे नाव असून तिथे चमेलीच्या फुलाला यास म्हणतात. मुलीचं नावही यास ठेवलं जातं. शुभ मानलं जाणारं हे नाव या वादळाला मिळणार असलं तरी पश्चिम बंगाल ओडिशासाठी ते आपत्तीच ठरणार आहे.

२६ मे रोजी संध्याकाळी ते या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान तौक्ते वादळानं राज्यात आणलेला पाऊस आता ओसरू लागला आहे. काल उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी तर राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

आज राज्याच्या सर्वच भागात पण तुरळक ठिकाणी हलका पाउस अपेक्षित आहे. आजपासून तापमानातही वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Exit mobile version