नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होण्यातलं सातत्य कायम असून गेला आठवडाभर दररोज 3 लाखांहून कमी असलेली देशभरातली नवबाधितांची संख्या आज 2 लाखांपेक्षा कमी 1 लाख 96 हजार 427 झाली. 14 एप्रीलनंतर प्रथमच ही संख्या 2 लाखापेक्षा कमी झाली आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण 9 पुर्णांक 54 शतांश टक्के आहे. देशातली उपचाराधीन रुग्ण संख्याही 1 लाख 33 हजार 934 नं घटली असून सध्या देशात 25 लाख 86 हजार 782 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतके दिवस रुग्ण संख्या घटत असली तरी मृत्यू संख्या मात्र सतत 4 हजाराहून जास्तच होती. आज तीही 3 हजार 511 इतकी नोंदवली गेली.
बरे झालेल्या रुग्णांची आज नोंदवली गेलेली संख्या 3 लाख 26 हजार 850 असून ती सलग 12 व्या दिवशी नवबाधितांच्या संख्येपेक्षा जास्त होती. देशातल्या आतापर्यंतच्या 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 कोरोना बाधितांपैकी 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण बरे झाले आहेत. 3 लाख 7 हजार 231 रुग्णांना मात्र आपले प्राण गमवावे लागले. सध्या देशात उपचाराधिन रुग्णांचं प्रमाण 9 पुर्णांक 60 तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 89 पुर्णांक 26 शतांश टक्के आहे. मृत्यूदर 1 पुर्णांक 14 शतांश टक्क्यांवर आला आहे. देशभरातल्या विविध राज्यांमधल्या कोरोना स्थितीवर नजर टाकली असता आज तमिळनाडू लक्षद्वीप आणि इशान्य भारतातली राज्यं वगळता इतर सर्व राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसून येते.
सर्वाधिक 32 हजार 551 इतकी घट कर्नाटकात नोंदवली गेली असून त्या खालोखाल महाराष्ट्रातली रुग्ण संख्या 20 हजार 790 तर केरळातली 18 हजार 714 नं घटली आहे. तमिळनाडूत रुग्णसंख्येतली सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. तिथे उपचाराधीन रुग्णांची संख्या 7437 नं वाढली आहे. इशान्य भारतातल्या आसामसह इतर सर्वच राज्यात आज रुग्णवाढ नोंदवली गेली. ती संख्येत कमी दिसत असली तरी ही राज्यंही छोटी आहेत.
काल दिवसभरात देशात कोरोना प्रतिबंधक लसींच्या मात्रा 24 लाख 30 हजार 236 व्यक्तींना देण्यात आल्या. यातल्या 22 लाख 51 हजार 452 व्यक्तींना पहिली तर 1 लाख 78 हजार 784 व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली. आतापर्यंत देशभरात कोरोना प्रतिबंधक लसींच्या एकंदर 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 मात्रा दिल्या गेल्या आहेत. यात 15 कोटी 52 लाख 35 हजार 374 व्यक्तींना पहिली तर 4 कोटी 33 लाख 3 हजार 625 व्यक्तींना दुसरी मात्रा मिळाली आहे. अजूनही 2 कोटी हून अधिक मात्रा देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत देण्यात आलेल्या मात्रांची संख्या 1 ते 2 कोटींच्या दरम्यान आहे.