राज्य सरकारकडून मदत मिळू न शकलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मिळणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषांप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.
त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केले. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते काल दुरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते.
सध्या एसटी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असली तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देशही परिवहन मंत्र्यांनी दिले.