Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आगामी दोन वर्ष ‘सीओपी’चे अध्यक्षपद आता भारताकडे, चीनकडून स्वीकारला कार्यभार

जागतिक स्तरावर भू-व्यवस्थापनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भारत नेतृत्व करणार

सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी आवश्यक त्या योजना राबवण्यावर भर देणार – केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि यूएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन म्हणजेच ‘यूएनसीसीडी’ च्या 14 व्या ‘सीओपी’चे  कार्यकारी सचिव यां इब्राहिम थिया यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. ग्रेटर नोएडा इथल्या इंडियन एक्सो सेंटरमध्ये ही परिषद 12 दिवस चालणार आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये आगामी दोन वर्षासाठी ‘सीओपी’च्या अध्यक्षपदी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी जावडेकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये जमिनीचे वेगाने होणारे वाळवंटीकरण आणि जमिनीचा कस कमी होणे या समस्यांवर दीर्घकालिन तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. ‘सीओपी-14’च्या आयोजनाचे यजमानपद भूषवताना भारत जैवविविधता, भूमी स्तर चांगला राखणे याकडे लक्ष देणार तर आहेच, त्याचबरोबर जागतिक स्तरावर भू-व्यवस्थापनाचा कार्यक्रम तयार करण्यासाठी भारत नेतृत्व करणार आहे, असंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.

सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या योजना राबवण्यावर भर देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘सीओपी-14’ च्या मुख्य निष्कर्षांनुसार कृषी, सामाजिक वनीकरण, भूमी आणि जल व्यवस्थापन त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलन क्षेत्रामध्ये कार्यक्रमामध्ये सहकार्य करणार आहे. शाश्वत विकास साधून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असंही जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हरित क्रांतीची उपक्रमाविषयी बोलताना पर्यावरण मंत्री म्हणाले, ‘‘आपण आशावादी असण्याची गरज आहे. आपण काय करतो, त्यावर आपला विश्वास असला पाहिजे. आपण भविष्याविषयी खूप आशावादी आहोत. जर मानवी चुकांमुळे नुकसान झाले असेल तर यापुढे मानवच चांगली कृती करेल आणि पर्यावरणाची  झीज भरून काढेल, असा माझा विश्वास आहे.’’

यावेळी  इब्राहिम थिया यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, ‘‘आगामी दोन आठवड्यामध्ये साडेतीन अब्ज लोकांचे आयुष्य चांगले बनवण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे.’’

या परिषदेच्या यजमान देशाचे निवेदन पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी केले. जमिनीची प्रतवारी कमी होणे, वाढते वाळवंट आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी भारत सक्रिय आहे. विविध उपाय योजना केल्या आहेत.  आम्ही गेल्या पाच वर्षात वनक्षेत्रांमध्ये आणि इतरत्र मिळून 15000 चैरस किलोमीटर क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड केली आहे, अशी माहिती सुप्रियो यांनी यावेळी दिली.

अधिक माहितीसाठी पहा Fast Facts about COP14

Exit mobile version